मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध पुन्हा पेटल्याची माहिती समोर आली. दोन्ही देशांनी रात्रीच्या वेळी एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. रशियाकडून युक्रेनच्या शहरांवर सातत्याने हल्ले होत असताना, युक्रेनकडूनही रशियाच्या सीमावर्ती भागांसह ऊर्जा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. युक्रेनकडे अमेरिकेची पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली असली तरी इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता ही मोठी अडचण बनली आहे. शत्रूची बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. मात्र, उपलब्ध इंटरसेप्टरचा साठा कमी असल्याने रशियाच्या मोठ्या प्रमाणावरील क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखणे युक्रेनसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
युक्रेनने रशियाच्या सीमावर्ती बेलगोरोड भागाला ड्रोनद्वारे लक्ष्य केले. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक लोक जखमी झाल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. जखमींमध्ये चार वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. ड्रोन हल्ल्यांमुळे बेलगोरोडमध्ये २९ निवासी इमारती, पाच खासगी घरे आणि एका प्रशासकीय इमारतीचे नुकसान झाले. काही व्यावसायिक आस्थापनांनाही फटका बसल्याची माहिती आहे. दुसरीकडे, रशियाने युक्रेनच्या खार्कीव्ह शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. काळ्या समुद्रावरील महत्त्वाचे बंदर असलेल्या ओडेसावरही रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
युक्रेनच्या हवाई संरक्षणासाठी अमेरिकेची पॅट्रियट प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जाते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इतर देशांकडून अतिरिक्त पॅट्रियट प्रणाली आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अमेरिकेसमोरही सध्या हवाई संरक्षण प्रणालींच्या उपलब्धतेचे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे युक्रेनला आवश्यक प्रमाणात पॅट्रियट इंटरसेप्टर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. युक्रेन आता देशांतर्गत पॅट्रियट प्रणालीच्या निर्मितीबाबतही प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर रशियाच्या क्षेपणास्त्र लाँचर्ससारख्या लष्करी लक्ष्यांचा शोध घेण्यासाठी आणि हल्ल्यांचे निर्देश करण्यासाठी एलन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रह संप्रेषण प्रणालीचा अधिक वापर करण्याचा पर्यायही चर्चेत आहे.
युक्रेनचे १५३ ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा
युक्रेनकडून लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर करून रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमुळे रशियातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून काही भागांमध्ये इंधन संकट अधिक गडद होत असल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनकडून रशियातील ऊर्जा केंद्रे, इंधन साठवणूक सुविधा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी दावा केला की, रात्रीच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील ड्रोन साठवणुकीचे गोदाम, इंधन डेपो आणि ओडेसा बंदरातील पुरवठा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. रशियाने रात्रीच्या कारवाईदरम्यान १५३ युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. रशियातील नोव्होरोसिस्क शहरात युक्रेनियन ड्रोनचे अवशेष दोन कंपन्यांच्या परिसरात आणि एका खासगी घरावर पडल्याची माहिती महापौर आंद्रे क्रावचेंको यांनी दिली. अधिका-यांच्या माहितीनुसार, ड्रोनच्या अवशेषांमुळे एका व्यक्तीला दुखापत झाली. दोन खासगी घरांचे नुकसान झाले असून एका अपार्टमेंट इमारतीच्या खिडक्याही फुटल्या.
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध पेटण्याच शक्यता
रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांच्या भूभागावर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्याने युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला युक्रेनला रशियाच्या हवाई हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अधिक पॅट्रियट मिसाइल आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची गरज आहे, तर दुसरीकडे युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाच्या ऊर्जा आणि इंधन पायाभूत सुविधांवर दबाव वाढत आहे.
















