वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम आहेत. घातक हल्ले तात्पुरते थांबले असले तरी, वाटाघाटी सुरू आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भर असून इराणच्या अणू कार्यक्रमावर नंतर चर्चा करता येऊ शकते, अशी भूमिका घेतली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या जवळच्या अधिका-यांना असे संकेत दिले आहेत की जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक पूर्णपणे पूर्ववत केली, तर अमेरिका अणु कराराशिवाय हा संघर्ष संपवण्याचा मार्ग शोधू शकते. परंतु, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी इराणने अशा अटी ठेवल्या आहेत की, करार होणे कठीण वाटत आहे.
इराणने ठेवल्या मोठ्या अटी
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर कठोर नव्या अटी ठेवल्या आहेत. अमेरिकेने आपली भूमिका बदलून इराणला पुन्हा धमकी देऊ नये, युद्ध थांबवावे, इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवावी आणि या भागातून आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केली आहे, तसेच युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, निर्बंध हटवणे आणि गोठवलेली इराणी संपत्ती विनाअट मुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत दबाव
हा संघर्ष लवकर संपवण्यासाठी ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत दबाव वाढत आहे. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांना तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत पेट्रोलचे भाव लक्षणीयरीत्या वाढलेले आहेत. ट्रम्प यांच्यासमोर हा संघर्ष अशा प्रकारे संपवण्याचे आव्हान आहे. होर्मुझमधील जलवाहतूक पुन्हा सुरू केल्याने ट्रम्प यांना राजकीय फायदा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.
















