लातूर : प्रतिनिधी
जीव संरक्षणच्या गोंडस नावाखाली पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितपणे हेल्मेटमुळे सुरक्षा असते. परंतु ही सक्ती लातूर महानगरपालिका हद्द तसेच जिल्ह्यातील सर्व शहराच्या हद्दीत नसली पाहिजे. तसेच महामार्गावर हेल्मेट सक्तीस अवधी द्यावा, या मागणीचे निवेदन नागरिक हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनला देण्यात आले.
हेल्मेटमुळे सुरक्षा मिळते यात वादाचा विषय नाही. परंतु, नागरिकांचे दैनंदिन कामकाज आणि बाजारातील खरेदी यावेळी हेल्मेट ठेवायचे कुठे. आजघडीला जिल्ह्यातील बाजारपेठेत दर्जेदार हेल्मेट उपलब्ध नाहीत. सक्तीमुळे बनावट हेल्मेटचा बाजार वाढणार आहे. नागरिकांची आर्थिक लुट होणार, या सर्व पार्श्वभूमीवर नागरिक हक्क संघर्ष समिती लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन हेल्मेट सक्ती ही राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग येथे असली पाहिजे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका आणि जिल्ह्यातील शहर हद्दीत नको, असे निवेदनात नमुद करण्यात आले असून हेल्मेट सक्ती विरोधी निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि लातूरचे आमदार यांनाही देण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने भाई अॅड. उदय गवारे, सूर्यप्रकाश धूत, बसवंत भरडे, अॅड. विजय जाधव, अॅड. प्रदीपसिंह गंगणे, पांडुरंग देडे, अॅड. प्रशांत काळदाते, अॅड. जैनोद्दीन शेख, शिवलिंग चौधरी, रईस टाके, अॅड. शिवाजी कोयले, सोहम कवठेकर, कॉ. विश्वंभर भोसले, अॅड. विजय पाटील, अॅड. गणेश यादव, अॅड. संजय पाटील, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
















