लातूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, वाढती वाहतूक आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. विशेषत: दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न करणा-या वाहनचालकांना गंभीर दुखापत होऊन जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हेल्मेट हा केवळ वाहतूक नियम नसून जीवन वाचविणारे सुरक्षा कवच आहे, हे लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यात १ सप्टेंबर पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात येत आहे. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विना हेल्मेट गाडी चालवल्यास मोटार वाहन कायदा कलम १२९/१९४(डी) नुसार कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी १ हजार रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तयामुळे १ सप्टेंबर पासून दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करणा-या वाहन चालकांना दंडास सामोरे जावे लागणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हेल्मेट वापराची सुरक्षित संस्कृती निर्माण करण्याचा लातूर पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग
जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून प्रथम राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक मार्गांवर हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन सुरुवातीला या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
तिस-या टप्प्यात लातूर शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर
जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्ग, ग्रामीण मार्गाच्यानंतर महानगरपालिकेतील प्रमुख रस्ते व शहरातील महत्त्वाच्या मार्गावर हेल्मेट अंमलबजावणी संबंधाने विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्यात येणार आहेत. एकंदर सर्व जिल्ह्यातील नागरिक हे नियमितपणे जोपर्यंत हेल्मेट वापरणार नाहीत तोपर्यंत हेल्मेट संबंधाने दंडात्मक कार्यवाही ही सुरूच राहणार आहे.
दुस-या टप्प्यात जिल्हा अंतर्गत सर्व ग्रामीण मार्ग
पहिल्या टप्प्यानंतर लातूर जिल्हा अंतर्गत सर्व ग्रामीण मार्गावर सदर मोहिम राबविली जाणार आहे. या मार्गावर प्रामुख्याने दुचाकीवर वाहतूक करणा-या लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. अपघाताचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या सुद्धा मार्गावर प्रवास करणा-या सर्वांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य असल्यामुळे हेल्मेट वापरा संबंधाने याही मार्गावर कारवाया करण्यात येणार आहेत.
















