मुंबई : भारतीय नौदलाची समुद्रातील ताकद आणखी वाढली आहे. मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये स्वदेशी बनावटीचे आयएनएस निपुण डाइव्हिंग सपोर्ट व्हेसल भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे दाखल करण्यात आले. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने (एचएसएल) हे जहाज स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले आहे.
नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कठर निपुणचे नौदलात कमिशनिंग करण्यात आले. या जहाजामुळे पश्चिम नौदल कमांडला खोल समुद्रातील बचाव आणि डाइव्हिंग मोहिमांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. सुमारे ८,५०० टन वजनाचे कठर निपुण हे जहाज 75 टक्के स्वदेशी सामग्रीपासून तयार करण्यात आले आहे. हे जहाज समुद्रात ३०० मीटर खोलीपर्यंत सॅचुरेशन डाइव्हिंग करू शकते. तसेच ७५ मीटरपर्यंत साइड-स्टेज डाइव्हिंग मोहिमाही राबवता येतात. समुद्रात एखादी पाणबुडी अडचणीत सापडल्यास तिच्यातील नौसैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीही आयएनएस निपुण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
समुद्राच्या तळाशी दुरुस्तीही शक्य
समुद्राच्या तळाशी एखादे जहाज किंवा यंत्रणा खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठीही या जहाजाचा वापर करता येणार आहे. यासाठी जहाजात १५ टन क्षमतेची सब-सी क्रेन, डायनॅमिक पोझिशनिंग सिस्टम आणि १,००० मीटर खोलीपर्यंत काम करू शकणारे आरओव्ही म्हणजेच रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स आहेत. खराब हवामान आणि समुद्राच्या मोठ्या लाटांमध्येही जहाज स्थिर राहू शकते. त्यामुळे खोल समुद्रातील कठीण आणि जोखमीच्या मोहिमा अधिक सुरक्षितपणे पार पाडता येतील.
जहाजात रुग्णालयाचीही सुविधा
आयएनएस निपुणमध्ये खोल समुद्रातील मोहिमांदरम्यान वैद्यकीय मदत देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. जहाजात ८ खाटांचे रुग्णालय, कउव, ऑपरेशन थिएटर आणि हायपरबेरिक मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत. डाइव्हिंगदरम्यान निर्माण होणा-या आरोग्यविषयक समस्या हाताळण्यासाठी या सुविधा महत्त्वाच्या ठरणार आहेत.
२०१८ मध्ये झाला होता करार
संरक्षण मंत्रालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडसोबत अशा दोन डाइव्हिंग सपोर्ट व्हेसलच्या निर्मितीसाठी सुमारे २,३९३ कोटी रुपयांचा करार केला होता.
या कराराअंतर्गत कठर निस्तार आणि आयएनएस निपुण ही दोन जहाजे तयार करण्यात आली. कठर निस्तार जुलै २०२५ मध्ये नौदलात दाखल झाले असून ते पूर्व नौदल कमांडअंतर्गत कार्यरत आहे. आता कठर निपुणच्या समावेशामुळे पश्चिम नौदल कमांडची खोल समुद्रातील बचाव आणि डाइव्हिंग क्षमता आणखी मजबूत झाली आहे. ३० जुलै रोजी आयएनएस निपुण नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये त्याचे अधिकृत कमिशनिंग करण्यात आले.
















