पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. किडनीच्या तपासणीसाठी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिरी आहे. गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना ताप, अशक्तपणा, खोकला, निर्जलीकरण यासारखी लक्षणे जाणवत होती. प्रकृती खालावल्याने अण्णांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
अण्णा हजारे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी राळेगणसिद्धी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अण्णा तीव्र विषाणू संसर्ग आणि डिहायड्रेशनने त्रस्त आहेत. मुंबईत डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरीराची पूर्ण तपासणी करूनच पुढील उपचारासाठी निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगण्यात आले.
















