मुंबई : प्रतिनिधी
अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मिर्झापूर द मूव्ही’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. ‘गुड्डू भैया’, ‘मुन्ना भैया’ आणि ‘कालीन भैया’ यांसारखी लोकप्रिय पात्रे मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ही उत्सुकता बॉक्स ऑफिसवरील कमाईत दिसून येत आहे. ‘मिर्झापूर द मूव्ही’ने अवघ्या चार दिवसांत १०० कोटी रुपयांचा नेट कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, सोमवारच्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
ट्रेड ऍनालिस्ट आणि समीक्षकांनी ‘मिर्झापूर द मूव्ही’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज सुमारे १८ ते २० कोटी रुपये व्यक्त केला होता. मात्र, चित्रपटाने अंदाजापेक्षा मोठी सुरुवात करत पहिल्याच दिवशी २५.७५ कोटी रुपयांची कमाई केली.
यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. दुस-या दिवशी ‘मिर्झापूर द मूव्ही’ने तब्बल ३२ कोटी रुपये कमावले. रविवारी प्रेक्षकांचा प्रतिसाद आणखी वाढला आणि चित्रपटाने ३६ कोटी रुपयांची कमाई केली.
सोमवारी कमाईत स्वाभाविकपणे काहीशी घट झाली असली, तरी चित्रपटाने १५.५० कोटी रुपयांची कमाई केली. वीकडेजमध्येही कमाईचा वेग कायम राहिल्याने चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
चार दिवसांत १०९ कोटींचा गल्ला
‘मिर्झापूर द मूव्ही’च्या आतापर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत एकूण १०९.२५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.
















