लातूर : प्रतिनिधी
गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी व गुरूमाई शकुंतलादेवी चिगरी यांच्या स्मरणार्थ येथील सुरताल संगीत महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरताल संगीत महोत्सवा’त शास्त्रीय गायनाच्या बहारदार सादरीकरणाने लातूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले. अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आणि पं. अंगद गायकवाड यांच्या कसदार आणि प्रभावी गायकीने रसिकांची मने जिंकली.
गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी व गुरूमाई शकुंतलादेवी चिगरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुमित्रा शांताराम चिगरी होत्या. द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालनचे तुकाराम पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कै. जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेचे प्राचार्य निलेश राजमाने आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रमेश चिल्ले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नंदिनी गायकवाड हिच्या गायनाने झाली. तिने राग बागेश्रीमध्ये विलंबित एकतालातील ‘सखी मन लागो ना’ हा बडा ख्याल सादर करून मैफलीला सुरेल प्रारंभ करून दिला. त्यानंतर द्रुत एकतालातील ‘डालो रंग मुँह पे ना’ हा छोटा ख्याल सादर केला. अखेरीस ‘चाहत सुधा सुरन गाना को’ ही ठुमरी सादर करून नंदिनीने रसिकांना भावसंगीताचा आनंद दिला. यानंतर अंजली गायकवाड हिने राग पुरिया सादर केला. तिने झुमरा तालातील ‘प्यार दे गर लागी’ हा बडा ख्याल अत्यंत प्रभावीपणे सादर केला. त्यानंतर तीनतालातील ‘रूप जो बन का मान न करिये’ हा छोटा ख्याल सादर करून आपल्या स्वरवैविध्याची आणि तालावरील पकडीची प्रचिती दिली.
कार्यक्रमाचा उत्तरार्ध पं. अंगद गायकवाड यांनी गाजवला. त्यांनी राग शुद्ध कल्याणमध्ये विलंबित एकतालातील ‘बोल न लागी’ हा बडा ख्याल सादर केला. त्यानंतर तीनतालातील ‘मंदलवा बाजो रे’ हा छोटा ख्याल सादर केला. कार्यक्रमाचा समारोप राग भैरवीतील ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या भावपूर्ण रचनेने झाला. कलाकारांना तानपुरावर पूजा दहिफळे, हार्मोनियमवर विजय श्रीमंगले, तबल्यावर पुण्याहून आलेले चैतन्य पवार, तर पखवाजवर विष्णू जगताप यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.
महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूरताल संगीत महाविद्यालयाशी जोडल्या गेलेल्या लातूरमधील विविध संगीत शिक्षकांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. प्रारंभी सोनू डगवाले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर पाटील यांनी मानले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मीनाक्षी कोळी, अमर कडतने, डॉ. संदीप जगदाळे, व्यंकट काळे, शिवाजी कंदगुळे, महेश काकनाळे, राहुल कांबळे, तेजस धुमाळ, हरीश कुलकर्णी, यशोदा जगताप, दिनेश पोखरकर, प्रसाद उमरदंड यांच्यासह आयोजक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला लातूरमधील अनेक कलाकार, रसिक, संगीत शिक्षक आणि संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















