लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी लातूर जिल्ह्यात सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने शेतक-यांना वेळेवर पेरण्या करता आलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी पेरणी केली होती, त्या ठिकाणी मागच्या दोन महिन्यापासून पुरेसा पाऊस न झाल्याने पिके अक्षरश: वाळून गेली आहेत
त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना सोयाबीन साठी एकरी ७० हजार, ऊसासाठी एकरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे, जनावरांसाठी चारा करावी, विंधनविहिर, विहिरींचे अधिग्रहण करण्यात यावे, सन २०२५ – २६ मध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा विमा शेतक-यांना त्वरित देण्यात यावा. चालू थकबाकीदार शेतक-यांना देखील दोन लाख रुपये कर्जमाफी देण्यात यावी, शेतक-यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी,अशा मागण्याही करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, माणिक गायकवाड, उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, व्यंकट मुळके, प्रकाश रोडगे, संतोष सोनपेटकर, ज्ञानेश्वर शिंदे, काकासाहेब शिंदे, रमाकांत मोरे, अजयकुमार बिरले, मधुकर मायंदे, गणेश चौंडे, काशिनाथ तळेकर, ईश्वर धुमाळे, अशोक धुमाळे, सिद्धेश्वर पाटील, सूर्यकांत सोनटक्के, जगदीश साकोळे , मल्लिकार्जुन भुरे, शिवशंकर डोंगरे, अफसर मुल्ला, एड. विजयकुमार जाधव यांच्या स्वाक्ष-या आहेत.
















