परभणी : बच्चेकंपनीसह सर्वांच्या लाडक्या गणरायाचे सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागात घरोघरी पारंपरिक पध्दतीने विधीवत पूजन करून श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळानी ढोल- ताशाच्या गजरात मिरवणूक काढत श्री गणेशाची स्थापना केली. गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठेत नागरीकांची पुजेचे साहित्य, मिठाई, फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
परभणी शहरासह जिल्हाभरात लाडक्या गणरायाचे सोमवारी घरोघरी उत्साहात आगमन झाले. लाडक्या गणरायाचे घरात आगमन होताच बच्चेकंपनीसह वयोवृध्द व घरातील मंडळीनी गणपती बप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाचा जयघोष केला. त्यानंतर घरोघरी पारंपारिक विधीवत पध्दतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळानी मंदिर देखाव्याच्या प्रतिकृतीचे पेंडाल उभारले असून संपूर्ण गणेशोत्सव दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दररोज आरतीला कोणत्या मान्यवरांना बोलवायचे याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
घरोघरी महिला मंडळीनी लाडक्या गणरायाच्या आवडीचे मोदक, वळीव लाडू, करंज्या असे पदार्थ आदी पासूनच तयार केले होते. गणेशोत्सवाच्या काळात दररोज कोणता नैवेद्य दाखवायचा याचे देखील नियोजन प्रत्येक कुटंबाने आखून ठेवले आहे. त्यामुळे दररोज आरती होताच विविध खाद्य पदार्थ खायला मिळणार असल्याने बच्चे कंपनीसह वयोवृध्द, महिला मंडळी व कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. विशेषत: बाजारपेठेत स्वीट मार्टच्या दुकानांमधून अनेक प्रकारचे मोदक उपलब्ध करून देण्यात आले होते. नोकरदार गृहिणींनी रेडीमेड मोदक खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. परभणी शहरातील बाजारपेठेत फुलांचे हार, रेडीमेड फुलांचे हार तसेच शोभेच्या वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या असून डेकोरेशनचे हे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
सेलू शहरात देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. विविध आकारातील गणेशमुर्ती घेण्यासाठी बच्चेकंपनीसह जेष्ठ नागरिक सहकुटुंबीय बाजारपेठेत आल्याचे पहावयास मिळाले. बच्चेकंपनीने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणरायाचे स्वागत केले. मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, जिंतूर, पूर्णा आदी तालुक्याच्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठमोठे आकर्षक देखावे उभारले आहेत. त्यामुळे आजपासून सपंर्णू गणेशोत्सवात नागरिकांची हे देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे.
परभणी शहरासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागाील बाजारपेठेत देखील गयरायाच्या विविधी आकारातील मुर्तींनी सजली होती. याशिवाय डेकोरेशनचे विविध साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करताना दिसून आले. याशिवाय बाजारपेठेत पुजेचे साहित्य, मिठाई व फळांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पहावयास मिळाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेत खरेदी- विक्री वाढल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
















