मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात १६ आरोपींविरोधात भिवंडी न्यायालयात तब्बल ३५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ठाणे शहर पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात पेपरफुटीची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका १ लाख रुपयांपर्यंत विकत घेण्यास तयार झालेल्या उमेदवारांकडून त्यांच्या गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षा म्हणून घेण्यात आले होते. प्रश्नपत्रिकेचे पैसे भरल्यानंतरच कागदपत्रे परत केली जाणार होती, अशी माहिती समोर आली आहे.
परीक्षा दिल्यानंतर फुटलेली प्रश्नपत्रिका खरी होती का, हे तपासूनच उमेदवार पैसे देणार होते. त्यामुळेच मूळ कागदपत्रे ताब्यात ठेवण्याची शक्कल लढवली गेली. फुटलेली प्रश्नपत्रिका ८० हजारांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या दरांनी विकल्या गेल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.
या प्रकरणातील एकूण १८ आरोपींपैकी १६ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपपत्रातील माहितीनुसार, अटकेत असलेला आरोपी प्रकाश पवारने दिल्लीतील फरार आरोपी अशोककुमार साओची भेट घेतली आणि २६ उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे त्याच्या हवाली केले. ही कागदपत्रे नंतर आणखी एका आरोपीच्या घरातून पंचनाम्या दरम्यान जप्त करण्यात आली.
फुटलेली प्रश्नपत्रिका परीक्षेला येऊनही उमेदवार किंवा एजंट नंतर पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असत. यातून मार्ग काढण्यासाठी आरोपी एजंट्सनी उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन ते प्रश्नपत्रिका विकणा-यांकडे देण्याचा पर्याय काढला. परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे पैसे दिल्यानंतरच कागदपत्रे परत केली जात , अशी माहिती तपास अधिका-याने दिली.
आरोपींची बाजू मांडणारे वकील शैलेश गायकवाड यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षकारांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही, जो खटल्याच्या सुनावणीदरम्यान सिद्ध होईल. २८ जून रोजी प्राथमिक शिक्षकांची पात्रता परीक्षा (टीईटी) होणार होती. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजेच २६ जून रोजी टीईटीचा पेपर फुटल्याची बाब भिवंडी पोलिसांच्या कारवाईतून समोर आली होती.
तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील ‘माहीम पत्रान प्रायव्हेट लिमिटेड’ या छापखान्यात प्रश्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या. कारखान्यातील दोन विद्यमान कर्मचारी आणि एका माजी कर्मचा-याने आपल्या बुटांच्या तळव्यात लपवून गोपनीय प्रश्नपत्रिकेच्या प्रती बाहेर नेल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याने केवळ ८,००० रुपयांमध्ये या तीन आरोपींना प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी तयार केले होते. बिजेंद्र गुप्ता हा कोचिंग क्लास चालवणारा माजी शिक्षक आहे. यापूर्वीही तो अनेक पेपरफुटीच्या प्रकरणात गुंतला होता.
















