पाटना : जमुई येथील दहावीच्या विद्यार्थिनीच्या छेडछाडीची घटना ताजी असतानाच आता बिहारमधील समस्तीपूरमधूनही अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. समस्तीपूर येथे भररस्त्यात एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत थेट भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओचा संदर्भ देत तेजस्वी यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, समस्तीपूरमध्ये अल्पवयीन मुलीची सर्वांसमोर काही तरुणांनी केलेली छेडछाड हा थेट पुरावा आहे की, भाजपशासित बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. राज्यातील सत्तेतील निर्लज्ज मंत्री नेहमीप्रमाणे या घटनेलाही किरकोळ घटना म्हणून संबोधून हात झटकून मोकळे होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
















