मुंबई : अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या तिस-या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. ‘दृश्यम ३’ने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली. अजय देवगणच्या कारकीर्दीतील सर्वांत मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, भारतातील ग्रॉस कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने ‘पठाण’, ‘ऍनिमल’ आणि ‘धुरंधर’सारख्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकल्याचा दावा केला जात आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘दृश्यम ३’ने पहिल्या दिवशी भारतात ६६.७५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन ८०.१० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
परदेशातील कमाईचाही चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे. ‘दृश्यम ३’ने ओव्हरसीजमध्ये सुमारे १५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे आकडे समोर आले आहेत. भारतातील ग्रॉस आणि ओव्हरसीज कलेक्शन मिळून चित्रपटाची पहिल्या दिवसाची एकूण जगभरातील कमाई ९५.१० कोटी रुपये झाली आहे. या आकड्यामुळे ‘दृश्यम ३’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या जवळपास मजल मारली आहे.
‘पठाण’ आणि ‘ऍनिमल’लाही टाकले मागे
‘दृश्यम ३’च्या पहिल्या दिवसाच्या ग्रॉस कलेक्शनची तुलना अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांशी केली जात आहे. शाहरूख खानच्या ‘पठाण’ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे ६५.९६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले होते.
रणबीर कपूरच्या ‘ऍनिमल’ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे ७६.१० कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केल्याचे आकडे आहेत. तर ‘धुरंधर’चे भारतातील पहिल्या दिवसाचे ग्रॉस कलेक्शन ३३.६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
अजय देवगणच्या कारकीर्दीतील मोठी ओपनिंग
‘दृश्यम ३’च्या कमाईमुळे अजय देवगणच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकीर्दीतील हा नवा विक्रम आहे. पहिल्याच दिवशी एवढी मोठी कमाई करणारा हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे.
आता चित्रपटाची खरी परीक्षा वीकेंडमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद कायम राहिला, तर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘दृश्यम ३’ वीकेंडमध्ये कोणते नवे विक्रम करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















