मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ब्रेकअपनंतर जवळपास दोन वर्षांनी दोघे पुन्हा एकत्र दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे दोघांचे पॅचअप झाले का? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, त्यांच्या पॅचअपबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, २०२४ मध्ये दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. आता पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका गाडीत बसल्यानंतर अर्जुन तिच्यासाठी गाडीचा दरवाजा बंद करताना दिसत आहेत. त्यानंतर ते दुस-या बाजूने गाडीत बसतात. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केवळ ‘मलायका अरोरा अँड अर्जुन कपूर स्पॉटेड टुगेदर इन द सिटी’ एवढेच लिहिण्यात आले आहे.
ब्रेकअपनंतरही नात्यात कडवटपणा नाही
अर्जुन आणि मलायकाने २०१८च्या आसपास आपलं नातं सार्वजनिक केलं होतं. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसायचे आणि सोशल मीडियावरही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करायचे. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२४ मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. त्याच वर्षी एका कार्यक्रमात अर्जुनने स्वत:ला ‘सिंगल’ म्हटले होते. ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये कोणतीही कटुता दिसून आली नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये एका शोमध्येही दोघे एकत्र दिसले होते.
















