वसमत : प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील चोंडी-आंबा टी-पॉईंट परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी संबंधित अधिका-याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून हल्ल्याशी संबंधित पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून हल्ल्याचे नेमके कारण काय आणि हा हल्ला कोणी केला, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर अज्ञात असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. घटनास्थळी उपलब्ध पुरावे, प्रत्यक्षदर्शींकडून मिळणारी माहिती तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे समजते.
मृत व्यक्तीची संपूर्ण ओळख महेश अण्णाराव शेळके राहणार नांदेड इंडियन कॉर्पोरेशन आईल उच्च अधिकारी असे असून हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपीबाबतची अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पेट्रोल पंपासारख्या वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घटनेने चोंडी-आंबा परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेचा छडा लावून हल्लेखोराला तातडीने जेरबंद करण्याचे आव्हान कुरुंदा पोलिसांसमोर आहे.
















