मुंबई : प्रतिनिधी
मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे पावर कपल दुस-यांदा आई-बाबा होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच त्यांच्या घरात नवीन बाळाचे स्वागत होणार आहे. दोघांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
पोस्टमध्ये एक सुंदर, हृदयस्पर्शी फोटो पाहायला मिळत आहे. ज्यात कियारा, सिद्धार्थ आणि त्यांच्या पहिल्या छोट्या लेकीचे चिमुकले हात पाहायला मिळत आहे. कियारा-सिद्धार्थची लेक सरायाह पांढ-या रंगाचा एक छोटासा मोजा हातात धरून असल्याचे दिसते आणि सिद्धार्थ- कियाराने तिचा छोटा हात धरला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्हाला पुन्हा एकदा सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे…आमची मने प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेली आहेत.
कियारा-सिद्धार्थने शेअर केलेल्या या गोंडस फोटोने सर्वांची मने जिंकली. या फोटोवर चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. दोघांना नवीन आयुष्यासाठी भरभरून प्रेम आणि शुभेच्छा देत आहे. कियारा ३५ व्या वर्षी दुस-यांदा आई होणार आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला जुलै २०२५ मध्ये पहिले बाळ झाले. कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचे नाव सरायाह असे आहे. आता मल्होत्रा आणि अडवाणी कुटुंब नवीन बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याची खरी सुरुवात २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटामुळे झाली. फेब्रुवारी २०२३ मध्ये कियारा-सिद्धार्थचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.
















