मुंबई : प्रतिनिधी
नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे, असे लिहित महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाना पाटेकर यांच्या अभिनयाबाबत आणि एक माणूस नाना कसे होते, याबाबत भाष्य केले आहे. नानांच्या अभिनयाला पाहून हॉलिवूडमधील मॉर्गन फ्रीमन आठवायचे, असेही ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून म्हटले आहे की, ‘ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण.
मुंबई आली की इथली रंगभूमी, इथले व्यावसायिक सिनेमाचे जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वत:चे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेले अंडरर्वल्डचे विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल,
पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणे आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारे राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. ‘हमीदाबाईची कोठी’पासून ते ‘परिंदा ’ते ‘क्रांतिवीर’ ते ‘अब तक छप्पन’ ते अगदी ‘नटसम्राट’पर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले.’ अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
तसेच,सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळे आत धुमसत असते. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणे किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडते, अन्यथा ते आत धुमसत राहते. हे धुमसत राहणे, प्रेशर कुकर सारखे आत रटरटत राहणे हेच त्याच्या वाट्याला येते.
नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसे नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी, संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचे किमान ६०/७० वर्ष मन रिझवले तसेच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झालं असते असे लिहिले आहे.
नानांना पाहून हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण
नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असे वाटते की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केले आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचे. या माणसाने खूप बघितले आहे. असे वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगले आहे आता बस असे वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातले दुसरे टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते.’’ अशा भावना राज ठाकरेंनी नानांच्या अभिनयाबाबत व्यक्त केल्या.
असंख्य भावनांचा चेहरा हरपला
तर आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरेंनी लिहिले की ‘नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे. नाना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली’
















