मुंबई : प्रतिनिधी
हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टद्वारे नाना पाटेकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाना पाटेकर हे अनेक अभिनेत्याचे मार्गदर्शक होते. रितेश देशमुख यांनी देखील नाना पाटेकर यांच्यासोबत सिनेमात काम केले आहे.
अभिनेते रितेश देशमुख पोस्ट करत म्हणाले,
आज शब्द थिजले आहेत, काळजावर जणू वीज कोसळली आहे. नाना गेले… या एका वाक्याने मन सुन्न, नि:शब्द झाले आहे. तुम्ही अभिनयाचे आकाश होतात, ज्याला तुलनेची सीमा नव्हती. तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात तुम्ही अढळ घर केले. कधी पडद्यावरचा तेजस्वी नायक, कधी अंगावर शहारे आणणारा खलनायक, तर कधी गंभीर चेह-यामागचा खट्याळ विनोद, प्रत्येक रंग तुमच्या अभिनयात खुलून आला. पडद्यावर तुम्ही हीरो होतात, पण पडद्यामागे त्याहूनही मोठे. तुमच्या संस्थेतून वाहत राहिली माणुसकीची निरंतर धारा. ‘ब्लफमास्टर’ आणि ‘हाउसफुल ५’ मध्ये तुमच्यासोबत पडदा वाटून घेतला, हे माझे भाग्य. पण एका मराठी चित्रपटात तुमच्यासोबत काम करणे, ही अपूर्ण ओढ आयुष्यभर उरी राहील.
तुमचे बोल, तुमच्या गप्पा, पाठीवरची ती कौतुकाची थाप, सोबत केलेले ते खळखळते हसू, ही माझी करी कमाई. कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि लाखो चाहत्यांना
माझी मन:पूर्वक सांत्वना.
नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी सिनेमात अनेक भूमिका साकारल्या होत्या. सिनेमात काम करताना सामाजिक कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यायचे. त्यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमांतून अनेकांना मदत केली. नाना पाटेकर हे अनेकदा शेतक-यांच्या मदतीला धावून जायचे. शेतक-यांनी आर्थिक कारणामुळे टोकाचा निर्णय घेऊ नये, यासाठी नाना पाटेकर सामाजिक उपक्रम हाती घेतले होते. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘खामोशी: द म्यूजिकल’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या विविध सिनेमातून नाना पाटेकर घराघरात पोहोचले.
















