मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपूर्वी वाढलेल्या वजनामुळे चांगलीच ट्रोल झाली होती. मुलाच्या जन्मानंतर तिने पहिल्यांदाच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. विकी कौशलसोबत ती पारंपरिक वेशभूषेत आली होती. एरवी एकदम सुडौल दिसणा-या कतरिनाला अचानक एकदम गुबगुबीत लूकमध्ये पाहिल्याने चाहते चकित झाले. तिला चक्क सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. आई झाल्यानंतर स्त्रीने लगेच बारीक होणे अशी लोकांची अपेक्षा का असते? असे म्हणत अनेकांनी ट्रोलर्सवर टीकाही केली. इंडस्ट्रीतूनही अनेक अभिनेत्रींनी कतरिनाला ट्रोल करणा-यांना सडेतोड उत्तर दिले. आता अभिनेत्री विद्या बालनची यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
विद्या बालन म्हणाली, ही किती बकवास गोष्ट आहे. जे लोक अशा प्रकारे ट्रोल करत आहेत त्यांनी आधी स्वत: आरशात बघणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे हे लोक कुठे ना कुठे स्वत:वरच नाशुख आहेत आणि त्यांच्यातच काहीतरी कमतरता आहे. तेव्हाच ते इतरांमधल्या उणिवा काढत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या जन्मानंतर स्त्रियांचे वजन वाढते याचा या लोकांना इतकाच प्रॉब्लेम असेल तर हे जे एआय एआय करत असत ना, त्या एआयने मुलंही जन्माला घाला. ती पुढे म्हणाली, डिलीव्हरीनंतर महिलेच्या शरिरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे एखाद्याच्या बॉडी अॅपिअरन्सची खिल्ली उडवण्याचा किंवा ट्रोलिंगचा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीच दिलेला नाही.
















