जालना : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिंदे यांनी भाजपकडून माझ्या नावाने ५०० कोटी रुपये घेतलेत अशी भाजपात कुचबूज सुरू असल्याचा दावा जरांगे यांनी केला होता.
मनोज जरांगेंच्या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी पुरावे देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी लढणा-या लोकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला.
तीन वर्षापासून माझ्याविरोधात षढयंत्र सुरू असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. माझ्याबाबत हे शत्रू आणि दुष्मनासारखे का वागत आहेत. मी तुमच्यासाठी लढत आहे. शिंदे साहेबांनी काल सांगितले की मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत आणि दिले नाहीत. मग हे इतक्या भयंकर स्वरूपाचे षडयंत्र का रचले जात आहे. त्याचा शोध पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, यावेळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. ही क्लिक राज्याला हादरवून सोडणारी असल्याचंही ते म्हणाले. आणि या प्रकरणात शिंदे आणि फडणवीस साहेबांनी स्वत: लक्ष घालावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या क्लिपमध्ये दोन व्यक्तींमध्ये चर्चा सुरू आहे. त्याच्यातील एक जण म्हणतो की, त्याच्याविरोधात (मनोज जरांगेंच्या) मराठवाड्यातील लोकं बोलायला तयार आहेत ना. आपण फक्त म्हणतोय की, त्याला हा पैसे देतोय तो देतोय, शरद पवार पैसे देतायत, असा आरोप करून आपण मोकळे होतो. त्याच्या विरोधातल्या चार जणांना आपण का पैसे द्यायचे नाहीत. आपल्याकडे पैसे नाहीत की काय? मी एकाची दरेकरांना भेट घालून दिली आहे, असा गंभीर दावा या क्लिपमधील व्यक्तीने केला आहे.
तसेच यावेळी तो पुढचा माणूस ठीक आहे मी बघतो मी प्रयत्न करतो असे म्हणत आहे. दरम्यान, यावेळी त्याला नाही आवरलं तर तो तुम्हाला मराठवाड्यात गिळेल असंही या क्लिपमध्ये एकजण म्हणत आहे. या क्लिपमध्ये या दोन्ही लोकांमध्ये आणखी अनेक मुद्यांवर गंभीर चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. शिवाय लोकल मिडिया कसं मॅनेज करायचे याबाबतही चर्चा करत आहेत.
दरम्यान, यावेळी एका महिलेची क्लिप देखील ऐकवली. ज्यामध्ये जरांगे पाटील यांना आधीच ५०० कोटी पोहोचले आहेत, असं सांगताना ही महिला श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत पैसे दिल्याचा उल्लेख करत आहे. ती म्हणते, जरांगे पाटील आपल्यासाठी विधानसभेसाठी आपल्या फायद्याचे राहतील की नाही याबाबत माझी आकडेवारी वेगळी आहे. आपल्याला त्यांच्यासोबत हे बघितलं पाहिजे की त्यांचं टार्गेट फडणवीस राहतील. मला असं वाटतं जरांगे पाटील यांच्या वैयक्तिक टार्गेटपासून बचाव करावं लागेल. तर आता जरांगेंनी आज थेट पुरावे देत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
















