परभणी : दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना नियमित व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिले. त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिंदे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रिकर, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष गुंजकर, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा, योजनांचा तसेच प्रशासकीय कामकाजाचा आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती व लोकसहभाग वाढविणे, गावनिहाय कृती आराखडा तयार करणे तसेच पालकमंत्री आरोग्यदूत अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर पथकांमार्फत नागरिकांना त्यांच्या गावात व घराजवळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी माथूर यांनी भर दिला आहे.
जिल्ह्यात माता व बालमृत्यू रोखण्यासाठी मातेच्या गर्भधारणेच्या नोंदणीपासूनच मातांना नियमित तपासणी, समुपदेशन व आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात. बालकांच्या नियमित लसीकरणासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करावे. गोवर-रुबेला सर्वेक्षण व अहवाल सादर करावा, टेलिकन्सल्टेशन, ई-सुश्रुत डॅशबोर्ड, एचएमआयएस व आयडीएसपी प्रणालीवर दैनंदिन अहवाल वेळेत सादर करावेत. जनआरोग्य समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना उपचारांचा लाभ मिळवून द्यावा, कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध राष्ट्रीय आरोग्य अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांच्या नियमित बैठका तसेच क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निक्षय मित्रांच्या माध्यमातून सर्व ८०० क्षयरुग्णांना पोषण किट उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
















