हरिद्वार : दिवाळीच्या दुस-या दिवशी सोमवती अमावस्येचा विशेष योग जुळून आल्याने धर्मनगरी हरिद्वारमध्ये श्रद्धेचा जनसागर उसळला. सोमवारी ब्रह्ममुहूर्तापासूनच हर की पौडीसह गंगेच्या विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी जमू लागली. सकाळी ८:३० वाजेपर्यंत सर्व प्रमुख घाटांवर मोठ्या संख्येने भाविक गंगास्रान करताना दिसत होते.
तोपर्यंत सुमारे ५० हजार भाविकांनी गंगामातेत श्रद्धेची डुबकी घेतली होती. विविध राज्यांतून हरिद्वारला आलेल्या भाविकांनी गंगास्रान करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, जीवनातील कष्टांपासून मुक्तीसाठी आणि मोक्षासाठी प्रार्थना केली. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध आणि पूजाअर्चाही केली. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला गंगास्रान, दानधर्म आणि पितरांच्या निमित्ताने केलेल्या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. यापूर्वी २०२३ मध्ये सोमवती अमावस्येला हरिद्वारमध्ये सुमारे २.५ लाख भाविकांनी गंगास्रान केले होते. यावेळीही मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस आणि प्रशासनाने सुरक्षेची व्यापक व्यवस्था केली आहे. हर की पैडी येथील ब्रह्मकुंडात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरू होती. गंगास्रान केल्यानंतर लोकांनी मंदिरांमध्ये पूजा-अर्चना केली आणि गरजूांना दान दिले.
















