जळगाव : प्रतिनिधी
दुष्काळ आणि महागाईचे सावट असतानाही राज्यात दीपावलीच्या कालावधीत विक्रमी सोने खरेदी करण्यात आली. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि पाडव्याचा मुहूर्त साधून राज्यभरात तब्बल ६२ हजार कोटींची सोन्याची उलाढाल नोंदवण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. एकट्या मुंबईतच ३२ हजार कोटींचे सोने विकले गेले.
सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांनी मोड देऊन नवीन हलके कमी वजनाचे दागिने, बारसह पारंपरिक दागिन्यांची खरेदी केली. यावर्षी सराफ बाजाराला राज्यभर तेजी होती. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आले, अशी माहिती ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ने दिली आहे.
गत वर्षी दिवाळीमध्ये सोन्याचा दर १ लाख ३१ हजार रुपयांवर पोहोचला. त्यानंतर ३० डिसेंबर २०२५ रोजी सोने १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आणि तिथूनच सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. २९ जानेवारीला सोने १ लाख ८६ हजार रुपये प्रतितोळापर्यंत पोहोचले. हा चालू वर्षातील सर्वात उच्चांकी दर सराफ बाजारात नोंदविण्यात आला. यामुळे एक तोळे सोने घेताना ग्राहकाला घडणावळ आणि जीएसटीसह २ लाख ११ हजार रुपये मोजावे लागले होते.
पुढे अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात घसरण झाली. ते प्रतितोळा १ लाख ६५ हजार रुपयांपर्यंत आले. गणपतीत १ लाख ५० हजार आणि दस-याला त्याचा भाव १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत आला. दस-याच्या दिवशी सोन्याच्या दरात तोळ्यामागे ४,२०० रुपयांची घसरण झाली. दस-याच्या सणाच्या दरात प्रथमच मोठी घसरण झाली होती. पुढे दर चढ-उतरणीचा हा सिलसिला सुरूच राहिला. दिवाळीच्या आधी दर घसरल्याने खरेदीदारांची चांदी झाली.
दिवाळीत आणखी दरवाढ होण्याच्या भीतीने या सणासुदीच्या काळात ग्राहकांनी सोने खरेदी केले. मात्र, दिवाळीत सोन्याचा दर गणपतीपेक्षा प्रतितोळा ९,२५० रुपयांनी कमी होऊन १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत आल्याने सोने खरेदीत गेल्या दिवाळीपेक्षा दुपटीने वाढ झाली. ही तेजी राज्यातील सर्वच प्रमुख शहरांतील सराफ बाजारात होती. एकट्या जळगाव सुवर्णनगरीत अंदाजे ३५० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाली.
..
















