मुंबई : साजिद नाडियाडवालांचा मोठा मुलगा सुब्हान आणि रोहित रॉयची मुलगी आयरा (कियारा) अभिनयाच्या जगात पदार्पण करणार आहेत.
चित्रपट निर्माता शशांक खेतान आपल्या आगामी ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं या चित्रपटातून सुब्हान आणि आयराला लॉन्च करणार आहेत. खेतान यांनी चित्रपटाचा टायटल व्हीडीओ रिलीज केला आहे. यात या दोन्ही नवोदित कलाकारांची पहिली झलक पाहायला मिळते. रोहित रॉय आणि मानसी जोशी रॉय यांच्या मुलीचे खरे नाव कियारा आहे. बॉलिवूडमधील पदार्पणासाठी तिचे स्क्रीन नेम आयरा ठेवण्यात आले आहे.
रोहित राय यांची मुलगी आयरा हिने २०२५ मध्ये ब्राउन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. तिने अर्थशास्त्र आणि कला इतिहास हे विषय घेतले होते. सुब्हानचे वडील साजिद नाडियाडवाला हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. चित्रपटाची कथा प्रेम आणि सूडावर आधारित असेल. व्हिडिओमध्ये सुरुवातीला दोन प्रेमींचा एक क्षण दाखवण्यात आला आहे. त्यानंतर कथेत एक धक्कादायक वळण येते.
हा चित्रपट ९ जुलै २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटासोबत शशांक खेतान त्यांच्या नव्या प्रोडक्शन हाऊस २१४ एंटरटेनमेंटची सुरुवातही करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमित चंद्रा, नलिनी दत्ता खेतान, करिश्मा ठक्कर आणि शशांक खेतान मिळून करत आहेत. चित्रपटाची कथा लिहिण्यासोबतच त्याचे दिग्दर्शनही शशांक यांनी केले आहे. सलमान खान यांनी बुधवारी ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि टीझर शेअर केला होता. उल्लेखनीय म्हणजे, शशांक खेतान यांच्या धडक या चित्रपटातून ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर ही जोडी मोठ्या पडद्यावर आली होती. आता ते सुब्हान आणि आयरा यांना संधी देत आहेत.
















