पुर्णा : येलदरी धरणातून कॅनलला पाणी सुटल्यामुळे कॅनलमधील कचरा सुरवाडी येथील पुलाच्या खाली अडकला. त्यामुळे कॅनल फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. पूर्णा पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक १ अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे दुष्काळात पाणी वाया गेल्यामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळामुळे पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वन-वन भटकत आहेत. सिंचनासाठी व पिण्यासाठी येलदरी धरणाचे पाणी सोडले होते. पूर्णा पाटबंधारे विभागाचा हा मुख्य कालवा नादुरुस्त असल्याने आणि प्रथम पाणी पाळीत वरून येणारा कचरा सुरवाडी शिवारातील भुई पुलाला अडकल्यामुळे पाण्याच्या मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. पाटबंधारे अधिका-यांनी लक्ष न दिल्यामुळे दि.१८ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता सुरवाडी येथील कॅनल फुटला. त्यामुळे कालवा फुटून पाणी वाहून गेले. यामुळे परिसरताील शेत जमिनी खरडून गेल्या आहेत.
या संदर्भात शेतक-यांनी अधिकारी संदीप भोसले यांना फोन केला. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने व गावक-यांच्या मदतीने फुटलेला कॅनल दुरुस्त केला. अधिकारी सकाळी १० वाजता आल्यामुळे नागरिकांसह शेतक-यांमध्ये तीव्र संताप पहावयास मिळाला.
















