पुणे : प्रतिनिधी
उन्हाचा पारा सतत वाढत आहे. जिवाची लाही होत असून, उन्हाच्या चटक्यापासून बचावासाठी नागरिकांकडून नानाविध प्रकार केले जात आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणून पांढरे कॉटन परिधान करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे अशा कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातील तापमान वाढले आहे.
उन्हाचा चांगला तडाखा जाणवत आहे. कामाव्यतिरिक्त नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळत आहे. बहुतांशी भागातील रस्ते सुने पडले आहे. इतकेच नाही तर उन्हापासून बचावासाठी त्यांच्याकडून विविध प्रकार अवलंबले जात आहे. पांढ-या कपड्यांनी उन्हाचा चटका कमी जाणवत असल्याने पांढरे शर्ट, पॅन्ट, बंडी तर महिलांकडून पांढरे टॉप, कुर्ता, पंजाबी ड्रेस, साडी, लेगीज परिधान करण्याचे प्रमाण वाढले आहे.
बाजारात अशाप्रकारचे पांढरे कपडे खरेदीकडे कल वाढला आहे. दुकानांमध्येही पांढरे कपडे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. कॉटन (सुती) कपड्यांमुळे गरम होण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाचा चटका जाणवत नाही. शिवाय त्यांचे वजनही कमी असल्याने उन्हाळ्यात अशा कपड्यांची अधिक मागणी असते.
पूर्वी केवळ साधे शर्ट आणि बंडी विक्रीस येत. सध्या बदलत्या युगाप्रमाणे नागरिकांची कपड्यांची बदलती पसंती लक्षात घेता, टी-शर्टपासून ते महिलांसाठी कुर्तीपर्यंत पारंपारिक तसेच वेस्टन पांढरी पोशाखही विक्रीस येत आहे. उन्हाळ्यात लुंगीचा वापर होत आला आहे. सुती कपड्याची लुंगी मोठ्याप्रमाणावर पुरुषांकडून परिधान केली जाते. सध्या उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत लुंगीचा वापर वाढला आहे. २५० ते ३०० रुपयांपर्यंत लुंगीची विक्री होत आहे.