24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडायू मस्ट डाय!

यू मस्ट डाय!

चिन्नास्वामीच्या फलंदाजधार्जिण्या खेळपट्टीवर श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्याने इंग्लिश संघासाठी स्पर्धेबाहेर जाण्याचे दरवाजे उघडले आहेत. गतविजेत्यांचा पाच सामन्यांतील हा चौथा पराभव. आता त्यांना उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. शिवाय इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागेल. म्हणजे पाहिल्या चार क्रमांकात प्रवेश करण्यासाठी तुम्ही कायम गॅसवर राहणार. स्पर्धेत दाखल झाल्यापासूनच साहेबांचे सारे काही बिघडले आहे. फलंदाजी चालत नाही आणि गोलंदाजी बोलत नाही.

कर्णधार बटलर कमालीच्या दबावाखाली आहे. आयपीएल गाजवणारा बटलर तो हाच का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते. चांगला प्रारंभ मिळूनही इंग्लंडची घसरगुंडी उडाली. पुनरागमन करणारा मॅथ्यूज, रजिथा आणि लहिरू कुमारा या मध्यमगती मा-याने इंग्लंडला १५६ धावांत गुंडाळले. मलान सरळ चेंडू थर्ड मॅनला वळवण्याच्या नादात यष्टीपाठी झेलबाद झाला. ज्यो रूट धावबाद झाला.

बटलर लहरू कुमाराच्या अप्रतिम चेंडूवर बाद झाला. श्रीलंकेने इंग्लिश खेळाडूंचे कच्चे दुवे लक्षात घेऊन योजना आखली होती. श्रीलंकेला दोन गुणांची गरज होती. ते मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. आता बलाढ्य संघांना त्यांनी धक्के दिल्यास स्पर्धेत बराच काही उलटफेर होऊ शकतो. श्रीलंकेचे क्षेत्ररक्षणही बहारदार झाले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कुसल मेंडीस लवकर बाद झाला. परंतु सलामी फलंदाज निसांका आणि मधल्या फळीतील समरविक्रमाने अर्धशतके फडकावल्याने श्रीलंकेला आरामात विजय मिळवता आला. श्रीलंकेने पावर प्लेमध्ये ५६ धावा झोडल्याने त्यांचे काम सोपे झाले. तिस-या विकेटसाठी या जोडीने १३७ धावांची नाबाद भागीदारी केली. श्रीलंकेविरुद्ध निराशाजनक पराभव स्वीकारावा लागल्याने इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये भयाण शांतता होती. अंकगणितदृष्ट्या इंग्लिश संघात अजूनही धुगधुगी शिल्लक असल्याचे दिसत असले तरी स्पर्धेतील इंग्लंड संघाचा सहभाग जवळपास संपल्यात जमा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाने साहेबांना ‘यू मस्ट डाय’ असेच बजावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR