नवी दिल्ली : संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल महुआ मोइत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता असून महुआ मोइत्रा यांचे अपात्रता निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता संसदीय पोर्टलवरील आपला लॉगइन आयडी आणि पासवर्ड कुणालाही शेअर करू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या संदर्भातील कथित लाचखोरी प्रकरणानंतर आगामी हिवाळी अधिवेशनाआधी लोकसभा सचिवालयाने खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार गोपनीयता ठेवण्याचा व लॉगइन-पासवर्ड कुणालाही न देण्याची सूचना खासदारांना करण्यात आली आहे. महुआ मोइत्रा यांनी त्यांचे लोकसभा पोर्टलचे लॉगइन आणि पासवर्ड मुंबईचे उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेअर केले होते व ते त्यांच्या वतीने त्यावरून प्रश्न विचारत असत. स्वत: मोईत्रा यांनी त्याची कबुली दिली होती.
सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर खासदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लोकसभा पोर्टलचा वापर फक्त खासदारच करतील. ते आपले लॉगइन शेअर करू शकणार नाहीत. त्यासोबत इतरही काही सूचना खासदारांसाठी जारी करण्यात आल्या आहेत. नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर ‘संविधान सदन’ असे नाव दिलेले आहे. जुने संसद भवन पाहण्यासाठी जगभरातून हजारो पाहुणे येत असतात. त्यासाठी खासदारांचे पत्र एवढीच अट पूर्वी होती. आता लोकसभा-राज्यसभेच्या उच्चपदस्थांच्या माध्यमातून पाहुण्यांव्यतिरिक्त अन्य सर्वसामान्यांना संसद पाहायचे असेल तर यासंदर्भातील अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. जे तात्पुरते पास बनविले जातात, त्यांची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत केली गेली आहे.