मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या संकटाच्या परिस्थितीत राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मदत, पुनर्वसन आणि आपत्ती निवारणमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी म्हटले आहे. राज्यात अनेक ठिकाणी रविवार (ता. २६)पासून अवकाळी आणि गारपीट सुरू आहे.
जिथे नुकसान झाले आहे, त्या सर्व संबंधित जिल्हाधिका-यांशी सरकारने चर्चा केली आहे. आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी अवकाळी, गारपिटीची शक्यता असल्याने सतत लक्ष ठेवून राहण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संकटकाळात दिली. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांना योग्यवेळी योग्य मदत तातडीने पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.