मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीत माहिम हा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या जागेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या जागेवरून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. यावरच त्यांनी आज पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे.
सदा सरवणकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी त्यांनी मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी माघार घेणार नाही. वेळोवेळी सांगितले आहे मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मला एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी एबी फॉर्म भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. अन्य कोणी माघार घेत असेल तर चौकशी करा, असे सदा सरवणकर म्हणाले.
‘वर्षा’वर गेलो पण मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही
दिवाळीच्या दिवशी कोणाच्या दारात जाणे, आपल्या कार्यकर्त्यांना, माता-भगिनींना त्यामध्ये गुंतवून ठेवणे हे मला पटत नाही. तरीसुद्धा माझ्या आज तीन-चार बैठका आहेत. मी ‘वर्षा’वर गेलो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली नाही. काही छोटी-मोठी कामे असतात. आमदार म्हणून ती इतर स्टाफच्या माध्यमातून होतात. दरवेळी मुख्यमंत्र्यांना भेटणे गरजेचे नाही, असेही सरवणकर यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका
राज ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले होते. त्यावर बोलताना सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी, मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे हास्यास्पद आहे. मी त्यांच्यावर टीका करावी असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे महायुती ठरवेल, असे सरवणकर म्हणाले.
मी माघार घेण्याचा प्रश्नच नाही
यासह मी माघार घेण्याचा प्रश्न नाही. महायुतीमध्ये मनसे नाही. मी एकटा पडलेलो नाही. मला जनतेचे आशीर्वाद आहेत. मी ठासून आणि ठामपणे सांगतो मी निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून येणार आहे. ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मी कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी निवडणूक लढवत आहे आणि निवडून येणार. जनता माझ्यासोबत आहे, असेही सरवणकर यांनी ठणकावून सांगितले.