नवी दिल्ली : राजस्थानमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले आहे. आता राज्यात सरकार स्थापनेची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. संसद भवनात सोमवारी बैठकांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राजस्थानमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्याचवेळी गजेंद्र सिंह शेखावत, बाबा बालक नाथ आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.
यासोबतच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आणि नेत्यांच्या निवडीसाठी निरीक्षकांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.
आता भाजप राजस्थानमध्ये सत्तेची सूत्रे कोणाकडे सोपवणार? यावरून चर्चेला उधाण आले आहे. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी सात दावेदारांची नावे पुढे येत आहेत. वसुंधरा राजे, गजेंद्र सिंह शेखावत, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, दिया कुमारी, सीपी जोशी आणि अर्जुन राम मेघवाल यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची ‘राजकीय प्रथा’ राजस्थानमध्ये यावेळीही कायम राहिली आहे.