33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रचौथ्या टप्प्यातील मतदानासाठी चोख बंदोबस्त

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी चोख बंदोबस्त

विमानतळे, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा अलर्ट प्रवाशांच्या बॅगेसह संशयित वाहनांची होणार तपासणी

पुणे : पुणे लोकसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पैशांचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पुणे विमानतळावर दाखल होणा-या नॉन शेड्यूल फ्लाइट (खासगी विमान व हेलिकॉप्टर)ने येणारे प्रवासी व नेत्यांची बॅग तपासणी सुरू आहे.

निवडणूक आयोगाचे पथक व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान (सीआयएसएफ) हे संयुक्तपणे बॅगेची पाहणी करीत आहेत. तर पुणे स्थानकावर रेल्वेने दाखल होणा-या प्रवाशांची आरपीएफचे जवान बॅगेज स्कॅनर मशिनच्या माध्यमातून बॅगेची तपासणी करीत आहेत. प्राप्तिकर विभागाचे पथक देखील स्थानकावर दाखल होणा-या प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सर्वच मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवले आहे. शहराच्या विविध भागांतील रस्त्यावर पोलिसांनी तपासणी नाकेदेखील सुरू केले आहेत. संशयित वाहनांची ऑन कॅमेरा तपासणी केली जात आहे. अशाच प्रकारे विमानतळावर दाखल होणा-या नॉन शेड्यूल फ्लाइटची तपासणी सुरू आहे. मागच्या २० दिवसांत ७० हून अधिक खासगी विमान व हेलिकॉप्टर पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. या सर्वांची पाहणी झाल्याची माहिती ‘सीआयएसएफ’च्या सूत्रांनी दिली.

‘शेड्यूल’ फ्लाइटच्या प्रवाशांवर नजर
नॉन शेड्यूल फ्लाइटसाठी निवडणूक आयोगाचे पथक तपासणी करीत आहे. ‘शेड्यूल’ फ्लाइटच्या प्रवाशांची तपासणी करण्याचा अधिकार मात्र केवळ ‘सीआयएसएफ’ यांना आहे. त्यामुळे ‘सीआयएसएफ’चे जवान देखील अधिक सजगतेने प्रवाशांची व बॅगेची तपासणी करीत आहेत. ज्या राज्यांत निवडणुका आहेत. त्या राज्यांत बारकाईने तपासणी करा अशा सूचना देखील निवडणूक आयोगाने ‘सीआयएसएफ’ ला दिल्या आहेत. त्यामुळे अधिक गांभीर्याने सुरक्षा यंत्रणा काम करीत आहे.

रेल्वे स्थानकावर एकच स्कॅनर मशिन
पुणे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक लगेज स्कॅनर मशिन आहे. या मशिनच्या माध्यमातून स्थानकात प्रवेश करणा-या प्रवाशांची बॅग तपासली जाते. मात्र या व्यतिरिक्त स्थानकावर दाखल होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तिथे कोणतीच तपासणी करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे स्थानकाच्या अन्य भागात देखील स्कॅनर मशिन बसविणे आवश्यक आहे. संशयित व्यक्तीवर सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे देखील लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे स्थानकावर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. स्कॅनर मशिनच्या माध्यमातून बॅगेची तपासणी होत आहे. ‘आयकर’ विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR