32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांना देण्यात आला इन्सुलिनचा डोस

केजरीवाल यांना देण्यात आला इन्सुलिनचा डोस

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखर वाढल्यानंतर त्यांना इन्सुलिन देण्यात आले आहे. तिहार तुरुंगाच्या अधिका-यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, केजरीवाल यांना सोमवारी संध्याकाळी कमी डोसचे इन्सुलिनचे दोन युनिट देण्यात आले, त्यानंतर त्यांची साखरेची पातळी २१७ आली आहे, असे तिहारच्या एका अधिका-याने सांगितले.

एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी २० एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरन्स दरम्यान तिहारच्या डॉक्टरांना सल्ला दिला होता की केजरीवाल यांची रक्तातील साखरेची पातळी एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त असल्यास त्यांना इन्सुलिन दिले जाऊ शकते. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या (आप) सूत्रांनी सांगितले की, तिहारमध्ये केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी ३२० च्या वर गेली होती. तरीदेखील त्यांना इन्सुलिनचा डोस देण्यात आला नव्हता. मात्र, सोमवारी सायंकाळी केजरीवाल यांना तुरुंगात पहिल्यांदाच इन्सुलिन देण्यात आले. दरम्यान, काल दिल्लीच्या विशेष न्यायालयानेही केजरीवाल यांना एम्सच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, इन्सुलिन देण्याचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते.

‘आप’ने मानले आभार
दरम्यान, केजरीवाल यांना इन्सुलिनचा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती मिळताच ‘आप’ने हनुमान जयंतीनिमित्त मिळालेल्या या माहितीचे स्वागत केले असून, डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, जय बजरंग बली. हनुमान जयंतीला आनंदाची बातमी मिळाली. अखेर तिहार प्रशासनाने अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन दिले. हनुमानजींच्या आशीवार्दाचे आणि दिल्लीतील जनतेच्या संघर्षाचे हे यश आहे, असे त्या म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR