नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीमध्ये ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ‘अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी हे प्रकरण निगडित आहे. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाच्या पथकाने १० एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी दिल्ली आणि गुरुग्राममधील १० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने, सोन्याच्या विटा आणि महागडी घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून ज्या ठिकाणी छापे टाकले गेले ती सर्व ठिकाणं ‘अर्थ ग्रुप’चे संचालक आणि संबंधित संस्थांशी जोडलेली आहेत.
छापेमारीदरम्यान ईडीने सुमारे ६.३ कोटी रुपये रोख, ७.५ कोटी रुपयांचे दागिने, चांदीच्या विटा आणि महागडी घड्याळं जप्त केली आहेत. हे संपूर्ण प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असून, या प्रकरणाची सुरुवात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या पाच एफआयआरमुळे झाली होती. या तक्रारींमध्ये अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासाचा भंग केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने देखील कंपनी कायद्याच्या कलम ४४७ अन्वये प्रवर्तक आणि संचालकांविरुद्ध गुन्हेगारी तक्रार नोंदवली आहे. तपासात असे समोर आले आहे की, अर्थ ग्रुपने ‘एं१३ँ’ या ब्रँडच्या नावाखाली दिल्ली-एनसीआर, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा आणि लखनौमध्ये अनेक मोठे रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केले होते. यामध्ये अर्थ टाऊन, अर्थ सफायर, अर्थ कोपिया, अर्थ टेकवन यांसारख्या अनेक प्रकल्पांचा समावेश होता.
लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठी आश्वासने
कंपनीने लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठी आश्वासने दिली होती, जसे की वेळेत फ्लॅट किंवा कमर्शियल युनिट देणे आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा देणे. या आश्वासनांवर विश्वास ठेवून १९,४२५ हून अधिक लोकांनी आपल्या आयुष्याची कमाई यात गुंतवली. तपासात असे उघड झाले आहे की, कंपनीने या गुंतवणूकदारांकडून सुमारे २०२४.४५ कोटी रुपये गोळा केले.
गुरुग्राम, दिल्ली, राजस्थानमध्ये जमिनीची खरेदी
गुंतवणूकदारांकडून घेतलेला पैसा प्रकल्पासाठी वापरण्याऐवजी तो इतरत्र वळवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या पैशाचा वापर गुरुग्राम, दिल्ली आणि राजस्थानमध्ये स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावाने जमिनी खरेदी करण्यासाठी केला गेला. पैशातून खरेदी केलेल्या मालमत्तांची विक्री करून घोटाळा लपवण्याचाही प्रयत्न केला गेला. या संपूर्ण घोटाळ्यात अवधेश कुमार गोयल, रजनीश मित्तल, अतुल गुप्ता आणि विकास गुप्ता या मुख्य नावांचा समावेश आहे.

