नवी दिल्ली : एअर इंडिया एआय-१७१ विमान दुर्घटनेच्या सुरू असलेल्या तपासात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी या संस्थेने केला आहे. या संस्थेने विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ला पत्र लिहून तपासाशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे. १२ जून २०२५ रोजी झालेल्या या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला होता.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी अअकइचे महासंचालक जी. व्ही. जी. युगंधर यांना पाठवलेल्या पत्रात ऋअरचे कार्यकारी संचालक एड पिअर्सन यांनी अअकइच्या तपासातील पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्हीटी-एएनबी विमानाशी संबंधित शेकडो अधिकृत, मात्र सार्वजनिक न केलेली कागदपत्रे यूके एएआयबीच्या एका तज्ज्ञामार्फत एएआयबीकडे पाठवण्यात आली होती. या कागदपत्रांमध्ये विमानाच्या विद्युत, इलेक्ट्रॉनिक आणि फ्लाइट कॉम्प्युटर यंत्रणांमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आणि प्रणालीगत त्रुटींची माहिती असल्याचा दावा एफएएसने केला आहे. दुर्घटनेची संभाव्य कारणे निश्चित करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या कागदपत्रांची दखल नाही?
आयसीएओ परिशिष्ट १३, विभाग ५ चा हवाला देत एफएएसने तपास करणा-या देशाने अपघाताशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती गोळा करून तिची नोंद आणि विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, या कागदपत्रांचा एएआयबीच्या प्राथमिक अहवालात, त्यानंतरच्या अंतरिम अहवालात किंवा त्यानंतरच्या कोणत्याही टप्प्यावर उल्लेख करण्यात आलेला नाही, असा आरोप पिअर्सन यांनी केला आहे.
एफएएसच्या पत्रानुसार, व्हीटी-एएनबी विमानाच्या एसीएआरएस आणि विमान आरोग्य निरीक्षण (एएचबी) या डेटा प्रणालींमध्ये विमानाच्या यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याचे संकेत होते. दुर्घटनेपूर्वी विशिष्ट बिघाड नेमक्या कोणत्या वेळी झाले, याची माहितीही या डेटामध्ये असल्याचा दावा संस्थेने केला आहे. मात्र, हा डेटा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचे एफएएसने म्हटले आहे.
अंतरिम सुरक्षा इशारे जारी केले नाहीत
यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याचे संकेत देणारी माहिती तपास यंत्रणेकडे असतानाही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी कोणत्याही अंतरिम सुरक्षा शिफारशी किंवा इशारे जारी करण्यात आलेले नाहीत, असा आरोप एफएएसने केला आहे. तपासाचा दोष केवळ एका वैमानिकावर ठेवण्याच्या दिशेने एएआयबीचा कल असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. या सर्व बाबींवर एएआयबीने तातडीने औपचारिक स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित कागदपत्रांचा तपासाच्या सार्वजनिक नोंदीत समावेश करावा, अशी मागणी एफएएसने केली आहे.
















