परभणी : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यासह आवश्यक ती मदत देण्याचे कार्य परभणी शहरातील आचार्य नगर मधील रहिवासी असलेल्या अश्विनी गोपाळराव बोर्डे करीत आहेत. या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने अश्विनी बोर्डे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कार्य करणा-या ३५ कर्तृत्ववान महिलांना मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय सभागृह, वसमतरोड परभणी येथे राष्ट्रीय’ नारी रत्न ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक इंजि. आर. डी. मगर, महापौर सय्यद इकबाल, डॉ. मो. समिउल्लाह खान, नगरसेवक अबोली कांबळे, शिवाजी विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर, डॉ. सय्यद खलील,लायनेस क्लब ऑफ परभणी अध्यक्ष प्रा. रेखा सावते, चित्रपट सहनिर्माते सुरेश हिवराळे, स्वागताध्यक्ष अॅड. पवन निकम, स्वागत कार्याध्यक्ष तुषार मराठे, एकताचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अश्विनी बोर्डे यांना अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘राष्ट्रीय नारी रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल अश्विनी बोर्डे यांचे भाऊ सुधीर बोर्डे, राहुलकुमार बोर्डे, सौमित्र बोर्डे यांच्यासह बोर्डे परिवार, कुटुंबिय, नातेवाईक व मित्र परिवाराने अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

