मंचर : प्रतिनिधी
तरुणीला पुणे नाशिक महामार्गावरून ओढून नेत कालव्यात फेकून देत एका तरुणाने स्वत:ही पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना पुणे नाशिक महामार्गावरमंचर बायपास रस्त्यावरील डिंभे धरणाच्या उजव्या काल कालव्यात सायंकाळी घडली होती. या मुलीचा मृतदेह तब्बल १८ तासानंतर त्याच ठिकाणी मिळून आला आहे. मुलीला कालव्यात टाकणारा रमेश बबन कडाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून स्वप्ना पोपट भांगरे (वय २१) असे मृत मुलीचे नाव आहे.
निघोटवाडी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी स्वप्ना पोपट भांगरे (सध्या रा. मंचर मूळ रा. वाघदरी ता.अकोले) ही तरुणी काम करते. कामावरून सुटल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती पुणे नाशिक महामार्गावर चालत आली. त्यावेळी रमेश बबन कडाळे (रा. खिल्लारवाडी ता.जुन्नर) हा तरुण तेथे आला. त्याने संबंधित तरुणीला पकडून महामार्गावरून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला ओढत डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याकडे नेत पुलावरून स्वप्ना पोपट भांगरे हिला पाण्यात फेकून दिले.
त्यानंतर संबंधित तरुणाने स्वत:ही कालव्यात उडी घेतली. महामार्गावरून शेतीकडे जाणारे निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी इतरांना फोन करून मदतीसाठी बोलावले. काही तरुणांनी कोणताही विचार न करता कालव्याच्या पाण्यात उडी मारून पाण्यात वाहत चाललेला रमेश बबन कडाळे याला धाडसाने बाहेर काढले. कडाळे याला बाहेर काढत असताना त्याने तरुणांवर दगडही फेकला.
रमेश कडाळे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर तरुणीचा शोध सुरू होता. तब्बल १८ तासानंतर आज १५ जून रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तो शवाविच्छेदानासाठी पाठविला आहे. पोपट चिंधू भांगरे यांनी फिर्याद दिल्यानंतर रमेश बबन कडाळे या तरुणा विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार नक्की कशामुळे घडला याचा शोध पोलीस घेत आहे.
















