लातूर: राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. तुकाराम मुंडे यांच्या धडक कार्यपद्धतीची चर्चा सुरू असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने थेट लातूरमध्ये धडक दिली आहे. या पथकाने लातूरच्या खंडोबा गल्लीतील खव्याच्या दुकानांवर अचानक छापे टाकल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
लातूर शहरातील खंडोबा गल्ली ही ‘खव्याची गल्ली’ म्हणून परिसरात ओळखली जाते. मात्र, येथे मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खव्याची विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगरच्या FDA पथकाने कारवाई करत अनेक दुकानांवर धाडी टाकल्या आणि तपासणीसाठी खव्याचे नमुने हस्तगत केले आहेत.
या अचानक झालेल्या कारवाईमुळे भेसळयुक्त खवा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाच्या या धडक मोहिमेचा धसका घेत अनेक खवा व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने तातडीने बंद ठेवली आहेत. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण भागाचा आढावा आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे, तुकाराम मुंडे यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात प्रशासनाचा वचक निर्माण झाला असून, लातूरमध्ये यापूर्वीच पानपट्टी व्यावसायिक आणि आता खवा विक्रेत्यांवरील कारवाईमुळे प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे दर्शन घडत आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
















