29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीयमुलांची जबाबदारी टाळणे मानसिक क्रूरता

मुलांची जबाबदारी टाळणे मानसिक क्रूरता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली हायकोर्टाने वैवाहिक संबंधाबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. वैवाहिक संबंधांना नाकारणे आणि मुलांची जबाबदारी घेण्याचे टाळणे ही मानसिक क्रूरता असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. लग्नाचे बंधन न मानणे आणि निर्दोष मुलांची जबाबदारी न घेणे ही गंभीर प्रकारची मानसिक क्रूरता असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

साथीदारावर विश्वासघाताचे निंदनीय आरोप करणे, मुलांना देखील चांगली वागणूक न देणे हे अपमान आणि क्रूरतचे सर्वांत वाईट रुप आहे. एखाद्या व्यक्तीला घटस्फोट मंजूर करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार आणि न्यायमूर्ती नीना कृष्ण बंसल यांच्या पीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली होती. फॅमिली कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर या व्यक्तीने हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. पण हायकोर्टानेदेखील याचिका फेटाळून लावली आहे. पती-पत्नीच्या विरोधात कोणतेही आरोप सिद्ध करू शकलेला नाही. त्याने आत्महत्या करण्याची धमकी देणे आणि गुन्ह्यामध्ये अडकवण्या प्रकरणी अस्पष्ट स्वरुपाचे आरोप केले आहेत, असे कोर्टाने म्हटले आहे.

विवाह एक मधुर संबंध आहे. एकमेकांवरील विश्वासातून हे नाते बहरत जाते. एकमेकांना दु:ख पोहोचणार नाही असे वागणे यात अपेक्षित असते, असे हायकोर्टाने म्हटले. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती महिलेला सप्टेंबर २००४ मध्ये भेटला होता, त्यानंतर एक वर्षांनी त्यांनी लग्न केले होते. व्यक्तीने आरोप केला होता की, तो जेव्हा मद्याच्या अमलाखाली होता, तेव्हा महिलेने लैंगिक संबंध ठेवले आणि लग्नासाठी दबाव टाकला. महिलेने गरोदर असल्याचे देखील सांगितले. महिला आत्महत्या करण्याची धमकी वारंवार द्यायची. शिवाय तिचे अनेक पुरुषांसोबत संबंध होते.

शारीरिक अत्याचाराचा आरोप
महिलेने आपली बाजू मांडताना म्हटले की, तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले आहेत. शिवाय मुलांना जन्म घालण्यास ती सक्षम नव्हती, तरी तिचे अनेक टेस्ट करण्यात आले. मुलांना जन्म न देता आल्याने तिला त्रास दिला जात होता. त्यानंतर महिलेने २००८ मध्ये एका मुलाला जन्म दिला, २०१० मध्ये जेव्हा मुलीला जन्म दिला, तेव्हा तिचा स्वीकार करण्यात आला नाही.

नोकरी गेल्याने पती पालन पोषणात अपयशी
कोर्टाने म्हटले की, नोकरी सोडल्यानंतर पती कुटुंबाचे पालन करण्यात अपयशी ठरला. तसेच मुलांचे पालनपोषण आणि घराच्या जबाबदारीसाठी कुटुंबाला संघर्ष करावा लागला. परंतु मुलांची काळजी न घेणे, साथीदारांवर निंदनीय आरोप करणे हे गैर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR