26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई मनपा आयुक्तपदी भूषण गगराणी

मुंबई मनपा आयुक्तपदी भूषण गगराणी

मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबई तसेच उपनगरांत मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे आयुक्तपद सौरभ राव यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला ज्या अधिका-यांनी एखाद्या नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्षे काम केले असेल, त्यांची बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश असूनही महाराष्ट्र सरकारने अशा अधिका-यांच्या बदल्या केल्या नव्हत्या. महाराष्ट्रासह देशभरात जवळपास अशीच स्थिती होती. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बदल्यांच्या मुद्यावर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता.

महाराष्ट्रात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची बदली करण्यात आली होती. त्यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले होते. निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र सरकारने इकबाल चहल, अश्विनी भिडे आणि पी. वेलारुसू यांची बदली करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. अखेर आयोगानेच बदल्या केल्या होत्या.

याआधी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नवी मुंबईचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राजेश नार्वेकर यांच्याकडे सहकार आणि निबंधक सहकारी संस्था, पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी या तीन आयएएस अधिका-यांची नावे सुचवली होती. निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर सरकारने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली केली. इक्बाल सिंह चहल ८ मे २०२० पासून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR