34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरभाजप २०० पार करू शकणार नाही

भाजप २०० पार करू शकणार नाही

सोलापूर : भाजप सरकारच्या काळात महागाई सर्वाधिक वाढली आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ते मागील दहा वर्षात करू शकले नाहीत. त्यामुळे एम. बी. पाटील ४०० पारचा नारा देणारे भाजप २०० पार देखील जाणार नाही, असा विश्वास कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सोलापूरचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील हे सोलापुरात आले होते. यावेळी बालाजी सरोवर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केदार उंबरनजे, बाळासाहेब शेळके, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महादेव बहिर्गोड-सावकार, नागठणचे आमदार विठ्ठल कटकदौंड, महादेव पाटील आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा, ना खानेढुंगा असे म्हणत मागील दहा वर्षात उद्योजकांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले.

महागाई वाढली, जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. दहा वर्षातच त्यांचा मुखवटा गळून पडला आहे. भाजप कमजोर झाली आहे. त्यामुळे धर्माचा आधार घेत केवळ निवडणूक लढवीत आहे. तरीही अब की बार ४०० पार करू, असा नारा ते देत असले तरी वास्तविक पाहता ते २०० चा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याच काळामध्ये या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यांना दर नियंत्रित ठेवता आले नाहीत. दरवर्षी दोन कोटी नोकरी देऊ, असे आश्वासन देत १५ लाखाचे आमिषही त्यांनी दाखविले होते.

देशातील २३ कंपन्यांनी करोडो रुपयाचे इलेक्ट्रोरल बॉण्ड खरेदी केले आहेत. या बॉण्ड खरेदीची चौकशी व्हावी, देशातील सर्वात मोठा घोटाळा बाहेर येईल. महागाईला कंटाळलेली जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजप देशात पिछाडीवर आहे. देशात पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्योगमंत्री एम.बी. पाटील म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नये, याकरिता कायदा आणखी कडक झाला पाहिजे. नेहाची हत्या करणारा कोणत्या समाजाचा होता? यापेक्षा आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. याचे कोणी राजकारण करू नये, असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR