सोलापूर : प्रतिनिधी
येथील मीरारोड येथे रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. तुला कलमा वाचता येतो का ? नमाज पढता येतो का असे विचारून एका व्यक्तीने दोन सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. जैब जुबेर अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी जैबला तातडीने अटक केली. त्याच्याकडे आयएसआयएस, जिहाद अशी लिहिलेली नोटसुद्धा आढळली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरोपीची संपूर्ण कुंडली सांगितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मीरारोड येथे झालेल्या हल्ल्याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी, ‘‘मुळात एकूण हे जे प्रकरण आहे ते बघितले तर सेल्फ रॅडिकलायझेशनचे हे प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तके, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नातून हा जो व्यक्ती आहे, जो आरोपी आहे तयार झालेला दिसतो. त्यामुळे याला केवळ काही तरी आपल्याला जिहाद करायचे आहे आणि जिहाद करायचे म्हणजे इतर धर्मियांना मारायचे आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्याने हे कार्य केलेले आहे.
रविवारी सकाळी नयानगर (मीरा रोड पूर्व) येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे, अस्मिता एन्क्लेव्हजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सकाळी ८ च्या सुमारास एका इसमाने दोघांवर चाकू हल्ला केला. हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव जैब जुबेर अन्सारी असे आहे. त्याने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पढता येतो का असे विचारून सुरक्षारक्षकावर हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याच्याकडे आयएसआयएस, जिहाद अशी लिहिलेली नोटसुद्धा आढळली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे? हे देखील शोधण्यात येईल. त्याचे कुटुंब हे परदेशात आहे. ते अमेरिकेमध्ये आहे. हा देखील अनेक वर्षे परदेशात राहिला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये त्यानंतर नवानगरमध्ये तो राहायला आला त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण कोण आहे? याच्या लिंकमध्ये कोण कोण आहे? अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये पुढे येतील.’
















