31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता भंग प्रकरणी कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

आचारसंहिता भंग प्रकरणी कोल्हापुरात ५ जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : सोशल मीडियावर निवडणुकीच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या जिल्ह्यात ११ घटना निदर्शनास आल्या असून, यातील ५ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उर्वरित ६ जणांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येडगे म्हणाले, सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवरून निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करू नका, अशा सूचना दिल्या होत्या. याचे उल्लंघन, गोपनीयतेचा भंग करणा-यांवर करडी नजर ठेवण्यासाठी वेगळी टीम कार्यरत केली होती. अनेकांनी मतदान करताना मोबाईलद्वारे व्हीडीओ शूटिंग करत ते व्हायरल केले आहे. यामुळे मतदान गोपनीयतेचा भंग झाला आहे. असे प्रकार जिल्ह्यात ११ ठिकाणी आढळून आले आहेत.

यात चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील असे प्रकार करणा-या लोकांची ओळख पटली आहे. यातील पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित ६ जणांवरही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, असे येडगे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.

ईव्हीएम मशिनचे चित्रीकरण
मतदान केंद्रात जाताना मोबाईल नेऊ नका, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्याचे उल्लंघन करत मोबाईलद्वारे ईव्हीएमचे व्हीडीओ चित्रीकरण केले आहे. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल केले असल्याचे येडगे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR