लातूर : प्रतिनिधी
शहरातील आरसीसी क्लासेस संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या अटकेनंतर मोटेगावकरच्या १२ वीत असलेल्या व नुकतीच नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाची सीबीआयने लातूर आणि पुण्यात कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयने आता शिवराज मोटेगावकर याच्या पत्नीलादेखील नोटीस बजावत पुण्यातील सीबीआय कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे.
संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणा-या नीट पेपर फुटीप्रकरणात दररोज नवा ट्विस्ट समोर येत आहे. सीबीआयने प्रा. शिवराज मोटेगावकर याची लातूरात त्याच्या घरी तब्बल ८ तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला सीबीआयच्या पुणे कार्यालयात हजर होण्याचा आदेश दिला होतो. मोटेगावकर सीबीआयच्या पुणे कार्यालयात जाताच त्याला अटक करून दिल्लीत नेऊन तेथे न्यायालयासमोर उभे केले.
न्यायालयाने त्यास ९ दिवसांची सीबीआय कोठडी सूनावली. त्या दरम्यान सीबीआयने मोटेगावकर याच्या मुलाची लातूर आणि पुण्यात चौकशी केली आणि आता मोटेगावकर याच्या पत्नीसही सीबीआयच्या पूणे कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान सीबीआयचे पथक लातूरमध्ये ठाण मांडून आहेत. या पथकाने आतापर्यंत काही डॉक्टर्स, पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी केली आहे.
















