मुंबई : प्रतिनिधी
लिफ्टमधील अपघातांना आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लिफ्ट, सरकते जिने आणि सरकते मार्ग यांच्या वापरासंदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, १२ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय किंवा प्रौढ व्यक्ती सोबत असल्याशिवाय लिफ्टचा वापर करता येणार नाही. मुलांनी एकट्याने लिफ्टचा वापर करू नये, त्यांच्यासोबत पालक किंवा मोठी व्यक्ती असणे आवश्यक असल्याची स्पष्ट सूचना लिफ्टमध्ये प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्याच्या ऊर्जा विभागाने महाराष्ट्र शासन राजपत्रात ‘महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग नियम, २०२६’ ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. नवीन नियमांनुसार, लिफ्टच्या प्रत्येक मजल्यावर तसेच लिफ्टच्या आतील भागात सुरक्षेसंदर्भातील सूचना स्पष्टपणे प्रदर्शित कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये १२ वर्षांखालील मुलांनी प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्टचा वापर करू नये, अशी सूचना अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच लिफ्टमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली असून, लिफ्ट पूर्णपणे थांबल्यानंतर आणि दरवाजे पूर्ण उघडल्यानंतरच प्रवाशांनी आत प्रवेश करावा किंवा बाहेर पडावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. लिफ्ट सुरू असताना दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नये, आग लागल्यास लिफ्टचा वापर करू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत अलार्म बटणाचा वापर करावा, असेही नियमांत स्पष्ट करण्यात आले आहे.
आपत्कालीन कॉलसाठी २४ तास सेवा आवश्यक
लिफ्टच्या सुरक्षेसाठी देखभाल आणि आपत्कालीन सेवांवरही विशेष भर देण्यात आला आहे. लिफ्टची देखभाल करणा-या परवानाधारक कंत्राटदारांकडे तक्रारी आणि आपत्कालीन कॉल स्वीकारण्यासाठी २४ तास, सातही दिवस सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक ५० लिफ्ट किंवा सरकत्या जिन्यांच्या देखभालीसाठी किमान एका देखभाल पथकाची तरतूद करण्यात आली आहे.
















