नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाणिज्य वापराच्या एलपीजीचे दर सिलिंडरमागे १११ रुपयांनी वाढवण्याची गुरुवारी घोषणा केली. तर विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलो लिटरमागे ७,३५३.७५ रुपयांनी म्हणजेच ७.३ टक्क्यांची गुरुवारी कपात करण्यात आली.
तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत १११ रुपयांनी वाढ केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत १,६९१.५० रुपये (दिल्ली) झाली आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,५३१.५० रुपयांवरून वाढून १,६४२.५० रुपये करण्यात आली आहे. ही दरवाढ दोन महिन्यांच्या दरकपातीनंतर झाली आहे. शेवटची दरकपात १ डिसेंबर २०२५ रोजी १९ किलोच्या सिलेंडरमागे १५.५० रुपये अशी करण्यात आली होती. त्यापूर्वी दर प्रति सिलेंडर ५ रुपयांनी कमी करण्यात आला होता.
व्यावसायिक एलपीजीचे दर आता गेल्या वर्षी जूनपासूनच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणा-या घरगुती एलपीजीच्या किमती एप्रिल २०२५ मध्ये ५० रुपयांच्या वाढीनंतर, १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ८५३ रुपयांवर कायम राहिल्या आहेत. ताज्या दर कपातीनंतर विमानाच्या इंधनाचे दर मुंबईमध्ये हे दर किलोलिटरला ८६,३५२.१९ रुपयांपर्यंत, तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरला ९२,३२३.०२ पर्यंत कमी झाले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. या कपातीमुळे विमान कंपन्यांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे, कारण त्यांच्या परिचालन खर्चापैकी जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. दरातील बदलाच्या परिणामाबद्दल विमान कंपन्यांकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर
गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रति लिटर २ रुपयांची कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत; सध्या मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ९०.३ रुपये आहे.

