नागपूर : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. अशातच सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला पुराचा विळखा पडल्याचे चित्र आहे. नदीला आलेल्या पुरामुळे सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. तर आल्लापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पेट्रोल पंपालाही पाण्याचा वेढा बघायला मिळतो आहे. तर तिकडे अमरावतीच्या मेळघाटमध्ये देखील पावसामुळे एकच हाहाकार बघायला मिळतो आहे. सिपना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तर आल्लापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून येथील पेट्रोल पंपालाही पाण्याने वेढा घातला आहे. जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील तब्बल १८ प्रमुख मार्ग पूरपाण्यामुळे बंद होते.
गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम आणि टेकमपल्ली नाले, तसेच आष्टी-आलापल्ली या राष्ट्रीय मार्गावरील दीना नदीसह अनेक ठिकाणी पाणी पुलांवरून वाहत आहे. एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यांतील अनेक मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
अमरावतीच्या मेळघाटात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र एकच हाहाकार बघायला मिळतोय. तर सिपना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात काल (२९ जुलै) दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिपना नदीला पूर आला असून, पाणी पुलावरून वाहत आहे. यामुळे २० ते २५ गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. याशिवाय, पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे तीन दरवाजे २० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत.
काल रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसासह आलेल्या चक्रीवादळामुळे गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या गावातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
















