28.4 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयजाहीरनाम्यावरुन वाद; खरगेंनी मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

जाहीरनाम्यावरुन वाद; खरगेंनी मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरगे पंतप्रधान मोदींना भेटून काँग्रेसचा जाहीरनामा त्यांच्याकडे सोपवतील आणि या जाहीरनाम्याची माहिती देतील. यासोबतच काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत मतदारांची दिशाभूल करू नका अशी विनंतीदेखील मल्लिकार्जुन खरगे पीएम मोदींना करणार आहेत. काँग्रेसने या महिन्याच्या पाच तारखेला लोकसभा निवडणूक २०२४ साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे.

पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, बेरोजगारी आणि तरुणांविषयी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र पंतप्रधान मोदी आपल्या प्रचारसभेत सातत्याने काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका करत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणूक रॅलीत काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमधील बांसवाडा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असे म्हटले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. ही शहरी नक्षलवादी मानसिकता आमच्या माता-भगिनींचे मंगळसूत्रही सोडणार नाही. काँग्रेसवाले सत्तेत आल्यावर घुसखोरांना संपत्ती वाटून देतील, असे पंतप्रधान मोदींनी सभेत सांगितले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगचा छाप
दरम्यान, पंतप्रधान मोदी सातत्याने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप असल्याची टीका करत आहेत. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की, त्यातून ते कधीच बाहेर पडू शकत नाही. त्यांनी तयार केलेला जाहीरनामा हा काँग्रेसचा नसून मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याचे दिसून येते, असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR