34.2 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रधरणसाठ्यांत घट, पाण्यासाठी वणवण

धरणसाठ्यांत घट, पाण्यासाठी वणवण

भीषण पाणीसंकट, जिथे पाणीटंचाई तिथे टँकर उपलब्ध करून देणार : गुलाबराव पाटील

मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना दुसरीकडे राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे तर संभाव्य पाणीबाणी लक्षात घेता सर्व जिल्ह्यांतील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

यंदा राज्यभरात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम हा धरण साठ्यावर झाला आहे. परिणामी ऐन उन्हाळ््यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. त्यात यंदा उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने आहे तो पाणीसाठा ही वेगाने घटत असल्याने पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. मात्र, असे असले तरी राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमीपर्यंत पायपीट करावी लागत आहे. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करत आहेत. एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणा-या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा कडक उन्हाळा असल्याने पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मराठवाड्यात तर पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. त्यामुळे नागरिकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

साडेतीन हजारांवर टँकर
सध्या राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असून पुढील काळात गरज पडल्यास त्याची संख्या अजून वाढू शकणार असल्याचा अंदाज आहे तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी पाण्याची बचत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

पाणी काटकसरीने वापरा
राज्यात जिथे आवश्यक आहे, तिथे खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात येणार आहेत. पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप दोन महिने कालावधी असल्याने आहे ते पाणी अतिशय काटकसरीने वापरण्याचे नियोजन सरकार करत आहे तर सध्या धरणसाठा असलेले पाणी केवळ पिण्याच्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR