मुंबई : २०१३ साली प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक गेल्या ११ वर्षांपासून वाट पाहत होते. अखेर, ही प्रतीक्षा संपली असून देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची हा चित्रपट आज २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खास गोष्ट म्हणजे देऊळ बंद २ हा शुक्रवारऐवजी थेट गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. गुरुपुष्यामृत योग आणि ब्रम्हमुहूर्त साधत गुरुवारी पहाटे ६ वाजता चित्रपटाचा पहिला शो ठेवण्यात आला होता. या पहाटेच्या शोसाठी पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी थिएटरबाहेर अक्षरश: रांगा लावल्या होत्या.
राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे. मुंबईतील मराठीबहुल भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ परिसरातही देऊळ बंद २ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे चित्रपट अधिक पकड घेणारा ठरला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे पडद्यावर उतरली.
















